पूर्ण क्रियाव्याप्ती (वर्तमान/भूतकाळ) या व्याकरणिक विशेषावरील नोंदीत [-एल्] या रूपाचा क्रियापदात्मक/विधेयात्मक वापर पर्यायी रूप २ म्हणून नोंदवला गेला आहे. प्रस्तुत नोंदीत [-एल्] या रूपाचे मराठीच्या काही विशिष्ट प्रादेशिक आणि सामाजिक बोलींमध्ये आढळणार्या विशेषणात्मक कार्याचे वर्णन नोंदवले आहे. ‘[-आल्]/[इल्]/[एल्-]’ हा प्रत्यय पूर्ण भूतकालवाचक तसेच धातूसाधित म्हणून सिंधी, माइया (वायव्येकडील भाषा), गुजराती, भिली, मराठी, कोकणी, खानदेशी (अहिराणी), हळबीच्या काही बोली त्याचप्रमाणे पूर्वेकडील भाषांमध्ये आढळतो, हे निरीक्षण साऊथवर्थ यांनी नोंदवले आहे (२००५: १३२).
काही उदाहरणे : सिंधी धोत्-आल्-आ कपरा ‘धुतलेले कापड’ गुजराती लाख्-एल्-ओ पत्र ‘लिहिलेले पत्र’ भिली पिक्-न्-एल् ‘पिकलेले’, कुन्-न्-एल ‘कुजलेला’ प्राचीन मराठी तुट्-आल-इ साऊली ‘तुटलेली सावली’ मराठी केल्-एल्-ए काम ‘केलेले काम’ खानदेशी कर्-एल् काम ‘केलेले काम’ कोकणी पिक्-आल्ल्-ओ आम्बे ‘पिकलेले आंबे’ (पाहा साऊथवर्थ २००५: १३२) १.0 व्याकरणिक विशेषाची नोंदमराठीच्या बोलींच्या सदर सर्वेक्षणात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये [-एल्] या रूपाचा भूतकालवाचक धातूसाधित विशेषण या कार्यासाठी वापर आढळला आहे : अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर. [-एल्] या व्याकरणिक विशेषाच्या भौगोलिक आणि सामाजिक प्रसाराविषयी माहिती व उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
अकोला | अकोला - गोपालखेड (कुणबी समाज) व येवता (बौद्ध समाज) |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट (राजपूत समाज), जळगाव-जामोद - निमकराड (पाटील समाज), शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
जालना | जालना - धावेडी - मराठा |
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली |
धुळे | धुळे - खेडे, शिरपूर - आंबे, साक्री - धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - धानोरा |
नाशिक | सटाणा - दरेगाव, त्र्यंबकेश्वर - गोलदरी व झारवड (खुर्द) |
पालघर | जव्हार - हातेरी (वारली समाज) |